गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोडापूर- झांजुर्डी शिवारातील शेत गट क्रमांक १७ मध्ये जबरदस्तीने ट्रॅक्टरने नांगरणी करताना विरोध केल्यामुळे एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती सचिन तुपे (२५, रा. कोडापूर झांजुर्डी (ता. गंगापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ ते १०.३० वाजेच्या सुमारास ज्योती वडिलांच्या मालकीच्या शेतात असताना संतोष पवार (रा. सोलेगाव), रसूल पठाण (रा. नांद्राबाद) व नजीर पठाण (रा. पुरी) हे तिघे ट्रॅक्टर घेऊन शेतात घुसले व नांगरणी सुरू केली. शेत माझ्या वडिलांचे आहे, नांगरटी करू नका, असे सांगितल्यावर आरोपींनी जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
यावेळी नजीर पठाण याने वाईट हेतूने उजवा हात धरून बाजूला ओढला तर संतोष पवार याने चापट मारून धक्काबुक्की केली. तसेच ट्रॅक्टरला आडवी आलीस तर अंगावर घालून मारून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती पतीला दिल्यानंतर ते आईसह घटनास्थळी आले. त्यानंतर आरोपी ट्रॅक्टरसह पसार झाले. त्यानंतर पीडित महिला पतीसह गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाली. घटनेप्रकरणी आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे करत आहेत.















